वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणात होणार शिक्षकांची " परीक्षा " किमान 50 % गुण प्राप्त न झालेस करावे लागणार पुन्हा प्रशिक्षण
schedule19 May 25 person by visibility 111 categoryशैक्षणिक

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणात होणार शिक्षकांची " परीक्षा "
किमान 50 % गुण प्राप्त न झालेस करावे लागणार पुन्हा प्रशिक्षण
कोल्हापूर दि. 19 : सलग सेवेची एकाच वेतनश्रेणीत 12 वर्षे व चौवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळतो. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत 21 दिवसांचे नि:शुल्क तर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावर हेऑनलाईन दोन हजार रुपये स:शुल्क पद्धतीने प्रशिक्षण आयोजित करण्यात येत होते.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था (SCERT )पुणे यांच्यावतीने या वर्षी पासून हे प्रशिक्षण पुन्हा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान सहभागी शिक्षकांची एकूण 300 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. यात किमान 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे. 50% गुण प्राप्त न झालेस सदरच्या प्रशिक्षणार्थी यांना पुढील प्रशिक्षणात पुन्हा नव्याने शुल्क भरून प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.
प्रशिक्षणा दरम्यान प्रत्येक तासिकेनंतर 10 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदरची ऑनलाईन परीक्षा निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ती वेळेत पूर्ण न केल्यास प्रशिक्षणास गैरहजेरी लागून प्रशिक्षण रद्द होऊ शकते.
प्रशिक्षणा दरम्यान 100 गुणांचा स्वाध्याय,दहा दिवसांच्या प्रशिक्षणानंतर 50 गुणांची लेखी परिक्षा, नवोपक्रम, कृती संशोधन आणि प्रकल्प यापैकी एक यासाठी 50 गुण आणि प्रशिक्षणा दरम्यान घेण्यात आलेल्या 10 गुणांच्या ऑनलाईन परिक्षांचे गुण हे 100 गुणांत परिवर्तीत केले जातील. या प्रत्येक परीक्षेत 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चाळीस दिवसापर्यंत पाच स्वाध्याय व नवोपक्रम कृती संशोधन प्रकल्प या पैकी पूर्ण करून देणे बंधनकारक आहे. पहिली ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते बारावी तसेच अध्यापक विद्यालय व कला व क्रीडा शिक्षक अशा चार गटात सदरचे प्रशिक्षण होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सदरचे प्रशिक्षण चार केंद्रावर होणार असून सकाळी 9:30 ते सायंकाळी 5ः30 वा. पर्यंत प्रशिक्षणाची वेळ असणार आहे. दिवसभरात एकूण पाच सत्रे असून दोनवेळ 15 मिटांची छोटी विश्रांती तर जेवणासाठी अर्ध्या तासाची जेवणाची सुट्टी असणार आहे.
शिक्षणातील नव संकल्पना व नवीन शैक्षणिक धोरणानुसार झालेले बदल यांची माहिती शिक्षकांना होण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी शाळा स्तरावर करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे. निश्चितच अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे
डॉ. राजेंद्र भोई
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,कोल्हापूर