मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?
schedule04 May 25 person by visibility 160 category

खूप छान वाटलं.कित्येक मुलं, मुली दहावीनंतर आज भेटलेत. 'कसा आहेस, भेटत नाहीस, घरी कोण आहे या विचारपूस बरोबर गळा भेट झाली. रक्ताच्या नात्या नंतर जोडलेले हे नातं म्हणजे मित्र-मैत्रिणी. बिंदास खेळणाऱ्या पोराटकीच्या नात्या नंतर प्रौढत्वाचे नातं सांभाळत असताना एखादा मित्र-मैत्रिणी भेटली की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि जुनं तेच सोनं असतं हे पटवून देतं.
दहावीची परीक्षा म्हणजे कठीण युद्ध वाटायचं. परीक्षा पास होत करियर झालं. आज असं वाटायला लागले शाळेच्या परीक्षेपेक्षा जीवनाची परीक्षा खूप अवघड आहे. शाळेत खर्च करायला पैसे नसायचे मात्र पैसे नसताना सुद्धा किती आनंद असायचा. आज पैसे आहेत मात्र आनंद नाही अशी अवस्था झाली. दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात करून बसून जाणारी आम्ही पोरं आज चार चाकी गाडी घेऊन फिरताना सुद्धा पूर्वीचा आनंद येत नाही. गावात हायस्कूल नाही म्हणून वडकशिवाले, म्हाळुंगे, कावणे, येवती या गावातून पायपीट करत येणारी पोरं पोरी, थकून दुपारचा डबा खाताना खूप आनंद वाटायचा. शाळेत काय शिकवणार यापेक्षा आज कोणाच्या डब्यात काय आहे हे सांगण्यात जी मजा होती ती मजा आज उरली नाही.कारण आज डबा राहीला नाही.
दहावीत अनेक मुलींच्या बरोबर बोलणं पण नव्हतं मात्र आज अनेक मित्र कशी आहेस म्हणून मैत्रिणीची विचारपूस करत होते. त्या सुद्धा तेवढ्याच प्रतिसादाने बरे आहे तुझं कसं चाललंय आपूलकीने विचारत होत्या. काही जण सांगत होते मी काल शेती केली आज केली आणि उद्याही शेती करणार खूप छान वाटले ऐकून.काम मोठं आणि छोटं कधीच नसतं मात्र जे काम प्रामाणिक करतो त्यात आपला अभिमान असायला पाहिजे. आज श्रीमंतीचे आणि गरिबीचे प्रदर्शन नव्हतं.आज प्रदर्शन होतं मित्र-मैत्रिणीच्या सोबत घालवलेल्या आनंदाच्या क्षणाचे. एका मुलीने तर मी कॉप्या करून पास झालो हे जाहीर सांगितलं . जेवढ्या जणांनी कॉप्या केल्या तेवढ्या जणांनी टाळ्या वाजवून तिच्या वाक्याला प्रतिसाद दिल्यानंतर आज मला कळालं कॉफी करून किती पोरं पास झाली होती.
मुलं, मुली म्हटले की, अनेकांना संशयाने बघणं असंच वाटत असतं पण मित्र-मैत्रिण हे नाते किती ग्रेट आहे. या नात्याला आहे तसं ठेवलं तर शेवटपर्यंत टिकते. त्याच्यामध्ये कुठला भेदभाव नाही, कमी जास्त नाही,बंधन नाही सगळं काही समान.
म्हणूनच आपण आज किती हक्काने आपलं म्हणून बोलत होतो. वर्गात बोलायचे काय बघायचं पण धाडस होत नव्हतं.तरी पण आज सगळी बिनधास्त बोलत होते. कुठेतरी चुकून वर्गातील मित्र मैत्रिणी भेटले तर किती आपुलकीने 'घरी चल, चहा घे, भेटत चल, परत ये'.असं आनंदाने बोलवतात.
यामध्ये किती जिव्हाळा वाटतो .आपण आनंदी होतो
28 वर्षानं एकत्र आल्यानंतर काही जणांचे वजन वाढले, पोट सुटलेले, काहींच्या डोक्यावरचे केस गेले, काही जणांचे दात सुद्धा तुटले अशा अवस्थेत एकमेकांना ओळखणे सुद्धा अवघड झालं. कारण 28 वर्षांपूर्वी आम्ही फाटकी कपडे घालून शाळेला जात होतो. उसवलेला शर्ट आणि इस्त्री नसलेली पॅन्ट अशा अवस्थेत आम्हाला बघितलेले मुलं मुली कसे ओळखणार.
आज सगळी इस्त्री करून, परफ्युम मारून, कोण कोट घालून आलं होतं मात्र तरीही काहींना ओळखण्यासाठी म्हणून ओळखीचा सुद्धा कार्यक्रम ठेवला होता. पुढे जाऊन नाव सांगा, पूर्वीचे नाव सांगा, आताचं नाव सांगा, गाव सांगा. अशी सांगायची वेळ आली होती.
कळत न कळत झालेल्या चुका आज जाहीरपणे पोर सांगत होती. पोरींची चेष्टा कशी केली, त्यांचे डबे कसे खाल्ले त्यांच्या बेंचवर भाकरीचे तुकडे कसे ठेवले, शिक्षकांच्या शिव्या सुद्धा कशा खाल्ल्या हे अगदी अभिमानाने सांगत होते.पोरी सुद्धा जुन्या आठवणी ऐकून खदाखदा हसत होत्या. शिक्षण घेत असल्यापासून ते लग्नापर्यंतच्या गंमती जमती सगळ्यांनी सांगितल्या. मी तर माझ्या लग्नात अंगावरचा कोट आणि पायात घातलेला बूट सुद्धा कसा मित्रांच्या कडून घेतला होता हे सुद्धा सांगून टाकले. मजा होती खूप.
काय पुरवलं नाही मित्रांनी.कपडे नसले तर मित्रांची कपडे घ्यायची घालायला. पॅन्टचा कलर गेला तरी कलर विकत आणून पाणी उकळून प्यांटला कलर आम्ही देत होतो. बहिणीला शिदोरी द्यायची असली तरी आमच्याजवळ गाडी नसायची एसटीची सोय नाही त्या ठिकाणी कसं जायचं म्हणून मित्रांच्याच वडिलांना विनंती करायची, शिव्या खात त्यांची गाडी फिरवायला न्यायची. आज गाडी मागायची वेळच येत नाही. मागितले तरी मित्र आनंदाने देतो कारण गाडी नसलेला मित्रच आता शिल्लक नाही.
मित्रांच्याकडनं हक्काने एखादी वस्तू मागताना किती आनंद असायचा. आज सगळे असून सुद्धा या गोष्टीचा आनंद वाटत नाही. कितीही महागडा शर्ट घेतला तरी मित्राने घेतलेला शर्ट मला खूप छान दिसणार म्हणून त्याच्याकडून शर्ट मागायचा. शर्ट घालून फिरायचा. इतका आनंद असायचा तेवढा आज स्वतः विकत घेतलेला शर्ट आनंद देत नाही.
आज ज्याच्या जवळ खूप आहे त्याच्याजवळ अजून काही नाही याची कटकट, ज्याच्याजवळ काहीच नाही ते का नाही म्हणून कटकट, श्रीमंतापासून गरिबापर्यंत कटकट सुटलेली नाही. विज्ञानवादी मानसशास्त्राची पुस्तक वाचत असताना एक गोष्ट लक्षात येते, सर्व काही असताना बिघडत चाललेली मानसिक अवस्था सुरळीत करायची असेल तर आनंदी जगा. आनंदी जगा म्हणजे काय असतं ते म्हणजे मित्र मैत्रीण. त्यांना सुखदुःख सांगणं. हलकं होणं म्हणजे समाधानाने जगणं. आनंद म्हणजे काय असतं तुमच्या जवळ नसलेली गोष्ट देणं म्हणजे आनंद नसतो.त्या वस्तू शिवाय ही आपण जगू शकतो. 'आहे रे, "मी सांग रे, बोल तू माझ्याशी.असं म्हणत मित्र मैत्रिणींना हलकं करणे म्हणजे आनंद असतो. मी बघितलाय मित्र खांद्यावर हात टाकून रडत्याला. आई- वडील सर्व काही पुरवत असताना मित्रांना सांगण्याची सुद्धा काही गोष्टी असतात. म्हणून ऐकलं पाहिजे.
तुमच्यातलं सगळं मत ऐकणं म्हणजे समाधान. मित्र म्हणून आम्ही आहोत तुमच्यासोबत बोला आमच्याशी. तुमचं ऐकायला. काहीही. आतुरतेने वाट बघत आहोत. आनंदाने सुखाचे, दुःखाचे क्षण ऐकण्याची.
आपला मित्र
प्रशांत चुयेकर
९७६५०२४४४३
८७८८२१३०७६