उध्दव ठाकरे ' टेंभी ' नाक्यावर सभा घेणार
schedule22 Aug 22 person by visibility 99 categoryराजकीय

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली होती. त्यामुळे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. उद्धव ठाकरे गट व शिंदे गट राज्यात सध्या चर्चेचा विषय आहे .ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता मिळवून दिल्यामुळे ठाण्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. आता याच ठाण्यात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यातही सभा दिघे यांच्या टेंभी नाक्यावर घेण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या सभेकडे लागून राहिले आहे.
ठाण्याने शिवसेनेला मागील २५ वर्षे निर्वाद सत्ता दिली आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहता ठाण्यात शिंदे गटाचे पारडे जड असल्याचे दिसून येते. जवळजवळ 90 टक्के शिवसैनिक ,महत्त्वाचे पदाधिकारी तसेच 67 पैकी 66 लोकप्रतिनिधी हे शिंदे गटात सामील झाले आहेत त्यामुळे सध्या तरी ठाण्यात शिंदे गटाचा दबदबा असल्याचे दिसून येत आहे .दुसरीकडे उद्धव ठाकरे गटही आक्रमक झाला असून नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात दोन्ही गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली. यातच शिवसेना ठाकरे गटाकडून जुन्या शिवसैनिकांना उभारी देण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येत आहेत.
टेंभी नाक्याला शिवसेनेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे स्थान आहे .याच टेंभी नाक्यावर स्वर्गीय आनंद दिघे यांनी नवरात्र उत्सवाची सुरुवात केली होती. तर याच टेंभी नाक्यावरून दिघे यांनी दहीहंडी उत्सव सुरू केला होता. तिथेच आनंदाश्रम आणि शिवसेनेचे निवडणूक कार्यालय आहे.यामुळे टेंभी नाक्याला अतिमहत्व प्राप्त आहे. आता याच टेंभी नाक्यावर उद्धव ठाकरेंची डरकाळी कानी पडणार आहे .शिवसेनेच्या माध्यमातून महाप्रबोधन यात्रा सुरू करण्यात येणार आहे आणि याची सुरुवात ठाण्यातूनच होणार आहे. टेंभी नाक्याला आजही दिघे यांच्या नावाने ओळखले जाते. आता इथूनच सभा घेऊन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना साद घालणार आहेत.