कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखल
schedule01 Jul 26 person by visibility 37 categoryगुन्हे
कोल्हापूर:
बिल्डरचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यवसायिकाकडे तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागून, त्याचे अपहरण करून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निलेश सुरेश जाधव (वय ३२, रा. अवधूत रेसीडन्सी, मोरे माने नगर, कळंबा रिंग रोड, कोल्हापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजित भगवान तिवडे (रा. रुईकर कॉलनी), फय्याज इसाक नगराजी (रा. साळोखेनगर), लखन बाळासाहेब माने (रा. उचगांव), संजय महाविर किरणगे उर्फ मायाभाई (रा. मनेरमाळा, उचगाव) आणि लाला शेट यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
खंडणीसाठी अपहरण आणि डांबून ठेवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश जाधव यांचा बिल्डरचा व्यवसाय असून मोरे माने नगर येथे त्यांची 'सोनी हाईटस' नावाची बांधकाम साईट सुरू आहे. या साईटवर व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडे १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.
दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास, आरोपी लखन माने याने फिर्यादी जाधव यांना त्यांच्याच गाडीतून जबरदस्तीने कावळा नाका येथे नेले. तेथून त्याचे साथीदार संजय किरणगे (मायाभाई) आणि लाला शेट यांनी जाधव यांना रुईकर कॉलनी येथील अजित तिवडे याच्या 'अजित ट्रेडर्स' ऑफिसमधील एका खोलीत जबरदस्तीने कोंडून ठेवले. तिथे १ कोटी रुपयांची खंडणी मागून धमकी देऊन त्यांना सोडून देण्यात आले.
कुटुंबाला आणि कामगारांना धमकावले
यानंतरही आरोपींचा त्रास थांबला नाही. ६ जून २०२६ रोजी आरोपी फय्याज नगारजी याने फिर्यादींच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांचे मोठे भाऊ प्रताप जाधव यांना "अजित दादांनी सांगितल्याप्रमाणे पैसे द्यायला सांग" अशी धमकी दिली.
तसेच ८ जून २०२६ रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी साईटवर असताना फय्याज नगारजी आणि संजय किरणगे यांनी पुन्हा तिथे जाऊन खंडणीची मागणी केली. त्यांनी तेथील कामगारांना शिवीगाळ करत "आमचा विषय मिटवल्याशिवाय काम चालू करायचे नाही" अशी धमकी देऊन बांधकाम बंद पाडले.
पोलिसांत गुन्हा दाखल
वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर निलेश जाधव यांनी ३० जून २०२६ रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८[२], १४०[३], १३८, ३३३, ३५२, ३५१[२], ३[५] अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.