कोल्हापूरवासीयांना आणखीन चार प्रगत वैद्यकीय सुविधा प्रदान करणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
schedule21 Aug 26 person by visibility 21 categoryराजकीय
शेंडा पार्कमधील बैठकीत घेतला विविध कामांच्या प्रगतीचा आढावा
कोल्हापूर, दि. २१ (जिमाका ) वैद्यकीय मंत्री म्हणून आपण सीपीआरच्या नूतनीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. कोल्हापूरवासियांसाठी लवकरच या रुग्णालयात अत्यंत माफक दरात आयव्हीएफ, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॅथ लॅब आणि ट्रामा आयसीयू या चार प्रमुख वैद्यकीय सुविधा सीपीआरमध्ये सुरू करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले .
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी शेंडा पार्क येथील सूरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा आज घेतला.
ते म्हणाले, शेंडा पार्क येथील सध्या सुरू असलेल्या काही इमारतींचे 31 मार्च 2027 अखेर लोकार्पण होईल.या लोकार्पणासाठी देशाच्या पंतप्रधान महोदयांना आणण्याचे विचाराधीन आहे शेंडा पार्कमध्ये सध्या शासनाने सर्कीट बेंचला जी जमीन दिली आहे त्याच्या लगत शिल्लक असलेल्या पाच हेक्टर इतक्या जमिनीबाबतची मागणी आपण मुख्यमंत्री महोदयांकडे करणार असल्याचे सांगितले तसेच सध्या या ठिकाणी सुरू असलेली सर्व बांधकामे कंत्राटदारांनी विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करवीत त्याचबरोबर मौजे सांगाव येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय,पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय तसेच कागल येथील ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभारण्यात याव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले .
ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत त्या त्या ठिकाणी पाणी,वीज,रस्ते आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत विशेष सतर्कता बाळगून आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत तसेच उत्तूर येथे सूरु असलेल्या कामांबाबत गती वाढविण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
चौकट : -अत्यंत कमी कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने सीपीआरचे नूतनीकरण केल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक विभागाचे कौतुक करून या नूतनीकरणाबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुक केल्याचे सांगितले तसेच या नूतनीकरणाशी सर्व संबंधित विभागाचे आभारही मानले .
या बैठकीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, वैद्यकीय उप अधिक्षक डॉ.गिरीश कांबळे शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अभिजीत अहिरे, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे, उप अभियंता श्री इंगवले, इलेक्ट्रिक विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती कट्टी, उप अभियंता श्री बनसोडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री सिकनीस,अतिरिक्त कार्य अभियंता श्री धुमाळ यांच्यासह इतर संबंधित विभागाचे अधिकारी संबंधित कंत्राटदार उपस्थित होते .