राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण प्रेरणा पुरस्काराने सचिन कदम यांचा गौरव
schedule28 Jun 26 person by visibility 70 categoryसामाजिक
कोल्हापूर , प्रतिनिधी : युवा क्रांती प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, परिते (जि. कोल्हापूर) यांच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल "राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण प्रेरणा पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सचिन कदम हे सन २०१६ पासून सामाजिक, राजकीय तसेच धम्म कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत. समाजहिताला प्राधान्य देत त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये निस्वार्थीपणे सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण व लोकाभिमुख कार्याची दखल घेत युवा क्रांती प्रतिष्ठानने त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली होती.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सचिन कदम यांनी हा सन्मान समाजातील सर्व सहकाऱ्यांचा असल्याची भावना व्यक्त करत, भविष्यातही अधिक जोमाने सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सन्मानाबद्दल दिंडनेर्ली परिसरासह विविध सामाजिक, राजकीय व धम्म क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून सचिन कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.