Awaj India
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणामहायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षसंघर्ष, जिद्द आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे श्रद्धा देवदत्त माने!अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;सरकारी सेवेत असतानाच खासगी नोकरी; डॉ. अमित पाटील यांच्याविरोधात बडतर्फीचा प्रस्तावमधुमित्र व मधुसखी पुरस्कारांसाठी ४ मे पूर्वी नामांकने सादर करावीत* आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 'समुपदेशक' नेमाविद्यार्थ्यां साठी मोफत शिक्षण

जाहिरात

 

महायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?

schedule26 Apr 26 person by visibility 788 categoryराजकीय

कोल्हापुरातील पाचपैकी कोणाला मिळणार विधान परिषदेची आमदारकी?
कोल्हापूर (प्रशांत चुयेकर):
विधानसभा निवडणुकीदरम्यान कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलेली आश्वासने आता पूर्ण होणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या इच्छुक नेत्यांना सोबत घेताना त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता ती आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आली असून, कोल्हापूरकरांचे लक्ष या घडामोडींवर लागले आहे.
विधान परिषद निवडणूक जवळ आल्याने या निवडणुकीत संधी मिळावी यासाठी कोल्हापुरातील इच्छुक नेत्यांची धडपड सुरू आहे. आपल्याला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी त्यांनी मुंबई वाऱ्या सुरू केल्या आहेत. या नेत्यांचे काय करायचे, आमदारकी द्यायची की महामंडळ, याबाबत महायुतीतील नेते विचारमंथन करत आहेत. एकूणच, कोल्हापूरला यातून नवे पद मिळणार का, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
कोल्हापूरवर नेत्यांचे प्रेम
कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा वारसा देशासह जगभर पोहोचलेला आहे. त्याच आदर्शातून विविध पक्षांनी कोल्हापूरवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही आपल्या राज्यात राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने जिल्ह्याचे नामकरण केले आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. त्याचवेळी भाजपनेही माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देत विजयी केले. तसेच, यापूर्वी भाजपने छत्रपती संभाजीराजे यांनाही राज्यसभेवर संधी दिली होती. त्यामुळे यावेळीही कोल्हापूरला न्याय मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
कोल्हापूर उत्तरमधून तिघे इच्छुक
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीवरून चुरस होती. विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबतच शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम हेही इच्छुक होते. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. तसेच, भाजपकडून इच्छुक असलेले नेते महेश जाधव यांनाही पक्षनेतृत्वाकडून आश्वासन मिळाल्याचे बोलले जाते.
हाळवणकर यांच्या निष्ठेला फळ मिळणार का?
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्यासाठी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी माघार घेतली होती. त्यांनाही विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांच्या निष्ठेला फळ मिळणार का, हे आता स्पष्ट होणार आहे.
कागलमध्ये उत्सुकता
नुकत्याच झालेल्या नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनाही आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला चांगले यश मिळाले होते. त्याची परतफेड विधान परिषदेत होणार का, याची चर्चा कागलमध्ये रंगली आहे.
निष्ठावंत बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या नावाची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनाही विधान परिषदेचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली होती. जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. तसेच, पक्षनिष्ठ नेता म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्हाभर दौरे करत त्यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढवली असून, त्यांना यशही मिळाले आहे.
आता या सर्व आश्वासनांची पूर्तता कोणाच्या वाट्याला येणार, याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे नेते आपले शब्द पाळणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes