मुरगुडमध्ये वृद्धाला लुटणारी इराणी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
schedule08 May 26 person by visibility 33 categoryगुन्हे
कोल्हापूर: आवाज इंडिया प्रतिनिधी
मुरगुड (ता. कागल) येथे एका ७६ वर्षीय वृद्धाची नजरचूक करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याची लगड, अंगठी आणि मोटारसायकलसह एकूण ३,१०,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास मुरगुड येथील मुख्य बाजारपेठेत विश्वनाथ भिवाजी शिंदे (वय ७६) हे पायी चालत जात होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी 'शहरात सोने चोरीला जात आहे' अशी बतावणी करून शिंदे यांना अंगावरील दोन सोन्याच्या अंगठ्या व चेन काढण्यास लावली. हातचलाखीने हे दागिने कागदात ठेवल्याचे भासवून आरोपींनी त्यांची फसवणूक केली आणि दागिने घेऊन पळ काढला. याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अतिग्रे येथे लावला सापळा
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार महेश खोत, विजय इंगळे आणि रोहीत मर्दाने यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रसुल इराणी याने केला आहे. तो आपल्या साथीदारासह कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील हॉटेल एक्सलसमोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
अट्टल गुन्हेगार ताब्यात
पोलिसांनी खालील दोन आरोपींना अटक केली आहे:
रसुल सरताज इराणी (वय ३२, रा. गांधी प्लॉट, जयसिंगपूर).
सुमित संदीप दाईंगडे (वय ३१, रा. जयसिंगपूर रेल्वे स्टेशनसमोर).
मुख्य आरोपी रसुल इराणी याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात जबरी चोरी व एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
तपास पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जप्त केलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी मुरगुड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.