१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत* *रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार*
schedule01 Jul 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाद्वारे ५ जुलै रोजी आयोजन
*कोल्हापूर:*
१२ वी सायन्स (PCB) विद्यार्थ्यांसाठी हेल्थकेअर आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअरच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत. या संधीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाद्वारे रविवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये "१२ वी PCB नंतरच्या करिअर संधी" या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली.
आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगात आरोग्य क्षेत्राचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. साहजिकच या क्षेत्रात रोजगाराच्या आणि व्यावसायिक प्रगतीच्या अनेक नवीन वाटा निर्माण झाल्या आहेत. या सेमिनारच्या माध्यमातून अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक विविध अभ्यासक्रम व संधींची माहिती देणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने फार्मसी, फिजिओथेरपी आणि नर्सिंग यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सातत्याने मागणी असलेल्या अभ्यासक्रम, त्याची प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, देश-विदेशात नोकरीच्या संधी याबाबत माहिती मिळेल. त्याचबरोबर हेल्थकेअर क्षेत्रातील इतर विविध संधी आणि 'इंटर डिसिप्लिनरी' म्हणजेच आंतरविद्याशाखीय क्षेत्रातील करिअरच्या वाढत्या पर्यायांची माहितीही दिली जाईल. सर्वाधिक संधी असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची आणि त्यातील करिअरच्या विस्तीर्ण कक्षांची माहितीही विद्यार्थ्यांना येथे दिली जाणार आहे.
या संपूर्ण सेमिनारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांसाठी हॉस्पिटल तसेच मेडिकलसह कॅम्पसमधील विविध कॉलेजेसना प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजचे वातावरण, अद्ययावत प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष कामकाजाची पद्धत जवळून पाहता येईल, ज्यामुळे त्यांना आपला करिअरचा निर्णय घेणे अधिक सोपे जाईल. विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या विविध शंका, भीती आणि संभ्रमांचे निरसनही यावेळी केली जाईल. थेट तज्ज्ञांशी संवाद साधून केले जाईल.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी या सेमिनारला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.