कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
schedule03 Jun 26 person by visibility 15 categoryराजकीय
कोल्हापूर: आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याचा सुनियोजित आणि सूक्ष्म विकास करण्यासाठी 'कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (KMRDA) स्थापन करण्यात यावे, या मुख्य मागणीसह जिल्ह्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी S4A ग्रुपचे प्रमुख राजू ऊर्फ सुनील श्रीपती माने यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी (दि. २ जून) जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.
राजू माने यांनी निवेदनात म्हटले आहे की, १९७४ च्या ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार आणि महानगर प्रदेश अधिनियमाच्या चौकटीत राहून कोल्हापूरसाठी 'KMRDA' ची मागणी आम्ही गेल्या वर्षापासून (५ जून २०२५ च्या निवेदनानुसार) करत आहोत. १९७५ च्या सुमारास देशातील चेन्नई, मुंबई, नागपूर, नाशिक, दिल्ली या शहरांची जी स्थिती होती, तशीच आज कोल्हापूरची आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा आणि नागरी सुविधांचा विचार करून नगर रचना कायदा कलम ४२ (ड) २१ व ४२ (एफ) १ व २ च्या नियमांनुसार संपूर्ण जिल्ह्याचा सूक्ष्म विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे.
तालुकानिहाय 'ग्रोथ सेंटर' आणि उद्योग उभारणी
निवेदनात सुचवल्याप्रमाणे, भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात करवीर (पूर्व भाग), हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ आणि शाहूवाडी हे तालुके उद्योग निर्मितीसाठी 'ग्रोथ सेंटर' ठरू शकतात. या भागात रिंगरोड, काँक्रीट रस्ते, क्रीडा विद्यापीठ, आयटी हब, इलेक्ट्रॉनिक्स हब आणि पर्यटन हब सारखे मोठे प्रकल्प उभे राहू शकतात. तर उर्वरित तालुक्यांमध्ये 'कृषी हब' व कृषी क्षेत्रासाठी ग्रोथ सेंटर विकसित करता येणे शक्य आहे. रोजगार वाढवणे आणि सध्या असलेले उद्योग टिकवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मेट्रो सिटीच्या धर्तीवर या मागण्या पूर्ण झाल्यास कोल्हापूरचा दर्जा 'क' वर्गातून थेट 'अ' किंवा 'ब' वर्गात जाणार आहे.
इतर महत्त्वाच्या मागण्या:
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज सर्वधर्मीय स्मशानभूमी: शेंडापार्क परिसरातील वैद्यकीय कॉलेजजवळ १०० एकर क्षेत्रात ही स्मशानभूमी उभारण्यात यावी आणि तिथे स्व. दिग्विजय खानविलकर यांचा प्रतिकात्मक पुतळा बसवण्यात यावा.
- पुणे-कोल्हापूर मेट्रो: पुणे ते कोल्हापूर दरम्यान मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी करावी.
- शेतकरी जनजागृती: शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नयेत, यासाठी जिल्ह्यात विशेष शेतकरी जनजागृती अभियान राबवावे.
- भिकाऱ्यांसाठी निवारा: कोल्हापूर जिल्ह्यातील भिकाऱ्यांसाठी मोफत निवारा केंद्र सुरू करावे.
- गृहप्रकल्प: जिल्ह्यात म्हाडा (MHADA) आणि सिडको (CIDCO) च्या माध्यमातून गृहप्रकल्प उभारण्यात यावेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व विषयांवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून सविस्तर चर्चा करावी. तसेच या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास विभागाकडे आपल्या स्तरावरून पाठवून, त्याबाबतची लेखी पोहोच एका महिन्यात मिळावी, अशी मागणी राजू माने यांनी केली आहे.