कोचिंग क्लासेसवरील जाचक अटी कमी करा; सर्वसामान्य संचालकांना दिलासा द्या – बी. एस. पाटील
schedule04 Jul 26 person by visibility 97 categoryशैक्षणिक
कोल्हापूर, प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील लखनौ येथे काही दिवसांपूर्वी एका कोचिंग/अॅनिमेशन सेंटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील कोचिंग क्लासेसची अग्निशमन विभागामार्फत तपासणी सुरू केली आहे. मात्र, या तपासणीदरम्यान लावण्यात आलेल्या काही जाचक अटींमुळे सर्वसामान्य कोचिंग क्लासेस चालकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असल्याचे मत कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशनचे बी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील म्हणाले की, तपासणीसाठी बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्र, टाऊन प्लॅनिंगशी संबंधित कागदपत्रे मागवली जात आहेत. शहरातील सुमारे ८० टक्के खाजगी कोचिंग क्लासेस हे भाड्याच्या जागेत चालवले जात असल्याने ही कागदपत्रे मिळवणे अनेक संचालकांना शक्य होत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षेसह आवश्यक नियमांचे पालन होणे गरजेचे असले, तरी अनावश्यक किचकट अटी कमी करून कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोल्हापूर शहरात जवळपास ५००, तर जिल्ह्यात सुमारे २,००० खाजगी कोचिंग क्लासेस व अकॅडमी कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश क्लासेस बेरोजगार युवक, महिला, गृहिणी आणि भगिनी आपल्या उदरनिर्वाहासाठी चालवतात. काही जण स्वतःच्या घरातूनही शिकवणी वर्ग घेतात. त्यामुळे सर्व खाजगी कोचिंग क्लासेसना एकाच निकषावर वेठीस धरणे योग्य नसून, सर्वसामान्य संचालकांना दिलासा देणारे धोरण महापालिकेने स्वीकारावे, अशी मागणीही बी. एस. पाटील यांनी केली.